

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजुला असणाऱ्या पार्कींगच्या जागेतच स्मार्टसिटी अंतर्गत विकास कामे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येथील पार्कींग बंद करण्यात आले आहे. त्यातच रिक्षा स्टॅण्ड व त्याच्या बाजूने असणाऱ्या गाळ्यांजवळ स्मार्ट फुड कोर्ट, गार्डन आणि शौचालय प्रस्तावित करण्यात आल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळ या कामाला परिसरातील व्यापारी व नागरिकांचा विरोध होऊ लागला आहे. या भागात पार्कींगची आधीच हालत बिकट असताना, हे स्मार्ट डोके कुणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत सुमारे 400 कोटींची विकास कामे होत आहेत. शहर स्मार्ट होणार असल्याने नागरिकांचेही या प्रकल्पाकडे लक्ष लागून आहे. मात्र काही ठिकाणी चुकीच्या पध्दतीने कामे सुरु असल्याचे मत नागरिकांचे होऊ लागले आहे. शहरातील मारुती मंदिर येथे आंब्याच्या झाडाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या समोर पार्कींग करण्यात येते. परंतु गेले दोन-तीन दिवस स्टेडियम समोरील चारचाकी पार्कींग बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच गाड्या लावाव्या लागत आहेत. या जागेत वृध्दांना बसण्यासाठी बाकडी बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे झाडेही लावली जाणार आहेत. दरम्यान, रिक्षा स्टॅण्ड व त्याबाजूला असणारे गाळे हटवून त्याठिकाणी स्मार्ट शौचालय उभे राहणार असल्याचे ठेकेदारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे व्यावसायिक,दुकानदारांत नाराजीचे वातावरण आहे.
चारचाकी वाहनचालकांना गाड्या रस्त्यावर लावल्यावर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे पार्कींग कमी का करण्यात येत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यातच वर्ष-दीड वर्षापूर्वी याठिकाणी पेवर ब्लॉक बसवून निधी खर्च टाकण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी का केली जात आहे? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाच्या दर्शनी भागात प्रस्ताविक शौचालय योग्य नसल्याची भूमिका नागरिकांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे येथील रिक्षा व्यावसायिक व खोकेधारकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान पार्कींग क्षेत्रात प्रस्तावित गार्डन तसेच प्रस्तावित शौचालय करु नये, अशी मागणी निवेदनाद्वारे व्यावसायिकांनी केली आहे.