Ratnagiri politics : महायुतीत बैठकांच्या फेऱ्या, मविआत अद्याप शांतताच

महायुती झाल्यास भाजपाकडून 12 जागांसाठी शिवसेनेसोबत चर्चा सुरु, बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेची खेळी
Ratnagiri politics
महायुतीत बैठकांच्या फेऱ्या, मविआत अद्याप शांतताचFile Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून रत्नागिरीत महाविकास आघाडी की महायुती होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागली असून महायुती झाल्यास भाजपाकडून कमीतकमी 12 जागांसाठी चर्चा शिवसेनेसोबत सुरु आहे. त्यातच बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी उमेदवारी जाहीर करण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मविआमध्ये राष्ट्रवादी व उबाठामधून नगराध्यक्षपदासाठी दावे केले जात असून आघाडी करण्यावर मात्र शांतता दिसून येत आहे.

शिवसेना-भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीबाबत दोन दिवसापूवीं मुंबईत बैठक पार पडली. यात शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र अनुपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद व नगर पंचायतींबाबत चर्चा झाली. यात रत्नागिरीमध्ये कमीतकमी 12 जागा मिळाव्यात यावर चर्चा करण्यात आली. गतवेळी भाजपाचे सहा नगरसेवक होते, तर नगराध्यपदा निवडणुकीत भाजपाने साडेआठ हजारहून अधिक मते घेतली होती.

या निवडणुकीत महायुती झाल्यास नगराध्यक्षपद ही शिवसेनेकडे जाणार असल्याने 12 जागा मिळाव्यात यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. योग्य जागा न मिळाल्यास काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्याची तयारीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे. शिवसेनेकडे सध्या माजी नगरसेवक संभाव्य उमेदवार म्हणून तयारी करीत असून, त्यांना उमेदवारी देता यावी म्हणून शिवसेनाही जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जागा व प्रभाग निश्चित झाल्यानंतर बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून 15 व 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुती बरोबरच महाविकास आघाडीमध्येही अजून पर्यत चर्चेच्या फेऱ्या सुरु झालेल्या नाहीत. शिवसेना उबाठाने नगराध्यक्ष पदाची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही नगराध्यक्षपदावर दावा टाकला असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील पदाधिकारी सध्या एकला चलो रेच्या भूमिकेत आहेत. शिवसेना उबाठाकडून परिवर्तन रॅली सुरु असून, शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढला जात आहे. त्यामुळे महायुती विरोधात शिवसेना उबाठा अशी थेट लढत होण्याची शक्यताही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. रत्नागिरीचे आमदार व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही पदाधिकाऱ्यांना काम सुरु करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. काही दिवसात पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news