

रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या बसस्थानकांची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकल्याने जिल्ह्यातील शंभरहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवार, २४ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील नऊ आगारांमधील एसटी बसेस, बसस्थानके, एसटी कार्यालय, प्रतीक्षागृहे आणि स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळीपूर्वी थकीत वेतन मिळावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
एसटी महामंडळाने दोन एप्रिल पासून प्रत्येक तिकिटावर दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारून बसेस, बसस्थानक परिसर आणि अन्य ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी क्रिस्टल कंपनीला ठेका दिला आहे. या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बसस्थानके आणि स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात होती. त्यामुळे बसस्थानकांचा परिसर स्वच्छ राहत होता. मात्र, कंपनीने जुलैपर्यंतचे वेतन दिल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे वेतन अद्याप दिलेले नाही.
थकीत वेतन लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी दसऱ्यापर्यंत काम सुरू ठेवले होते. मात्र, त्यानंतरही वेतन न मिळाल्याने आणि दिवाळी तोंडावर आल्याने कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचे हत्यार उपसले. जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सफाई कर्मचारी कामावर नसल्याने बसस्थानकांवरील कचरा उचलला जात नाही. प्रतीक्षागृहांमध्ये धूळ साचली असून स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांना या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतेचा प्रश्न ऐन दिवाळीच्या तोंडावर निर्माण झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
स्वच्छतेचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी
एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवरील स्वच्छतेसाठी तिकिटामधून दोन रुपये घेतले जातात. मात्र, सध्या बसस्थानकांवर कचरा साचला असून फरशीवर धूळ आणि स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तोडगा काढून बसस्थानकांची स्वच्छता पूर्ववत करावी.