

रत्नागिरी : इराण-इस्त्राईल, अमेरिका युद्धामुळे तसेच जागतिक घडामोंडीमुळे देशांतर्गत बाजारात इंधन टंचाई, दरवाढ सतत होत आहे. या महागाईचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे. वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रणाठी प्रशासनाने बसचे मायलेज वाढवण्यावर भर दिला असून प्रतिआगार दैनंदिन पाच लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहनपर भत्ता, आगारांना दरमहा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. जिल्ह्यातील ९ आगारातून तब्बल ४५ लिटरची बचत होणार आहे.
ज्या चालकांच्या किलोमीटर प्रतिलीटर प्रमाण कमी येत असेल, त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यासारख्या मुद्द्यांवर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच बसेसची दैनंदिन तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी यावरही भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ९ आगार आहेत. महामंडळांना नव्या नियमानुसार प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेलची बचत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.