

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्यात मोठा आर्थिक फटका बसला असून, कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामध्ये कोकणातील रत्नागिरी विभाग ९.३२ कोटी रुपयाने तोट्यात असणारे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक विभाग प्रथम, कोल्हापूर, सातारा, सांगली विभागही मोठ्या तोट्यात आहेत.
रत्नागिरी विभागात मोठ्या प्रमाणात एसटी बसेस भंगारात गेल्या आहेत. काही बसेस नवीन आल्या मात्र तरीही बसेस अपुऱ्याच आहेत. चालक, वाहकासह विविध पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्याचा परिणाम रत्नागिरी विभागावर वारंवार होत आहे. बसेस वेळेवर सुटत नाहीत. आलेली बसेसची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे काही प्रवासी आता खासगी प्रवासाकडे वळले आहेत. वडाप, मिनीबस, चारचाकी वाहनांचा आधार घेत घर गाठत आहेत. रत्नागिरी विभागाला नफ्याला आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
शहरी बससेवा नगरपरिषदेकडे वर्ग करून ग्रामीण बससेवेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन बसेस येणे गरजेचे आहे. चालक, वाहक, यांत्रिक कामगार भरती करणे गरजेचे आहे. ई-बसेस आल्यास आणखी भर पडेल. ज्या मार्गावर गर्दी आहे त्याठिकाणी जादा बसेस सोडणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करणे गरजेचे, वेळेत स्टॉपला बसेस आल्या पाहिजेत, नियोजन केल्यास टप्प्या टप्प्याने तोटा कमी होत जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.