Ratnagiri News : लालपरीत भोंदूबाबांच्या जाहिरातींचा सुळसुळाट

जाहिरातीमुळे बसचे विद्रुपीकरण; प्रवाशांची दिशाभूल
ST Bus
ST Bus
Published on
Updated on

रत्नागिरी : महाराष्ट्राची लाडकी ‘लालपरी’ म्हणून ओळखली जाणारी एसटी ही राज्याची जीवनवाहिनी मानली जाते. दुर्गम भागांपासून शहरांपर्यंत लाखो प्रवाशांना रोज पोहोचवणारी ही सेवा आजही सर्वसामान्यांचा आधार आहे. मात्र, रत्नागिरी विभागातील एसटी बसेसमध्ये सध्या भोंदूबाबा, बंगाली बाबा, वशीकरण, जादूटोणा आणि अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या भ्रामक जाहिराती मोठ्या प्रमाणावर लावल्या जात असल्याने या ‘लालपरी’चे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणाऱ्या बसेसमध्ये अशा अनधिकृत जाहिरातींचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.

बसच्या खिडक्या, सीटच्या मागील बाजू, आतील भाग, तसेच बाहेरील पत्र्यावर स्टिकर्स आणि पॅम्पलेट्स मोठ्या प्रमाणावर चिकटवले जात आहेत. काही ठिकाणी तर बसच्या रंगावरच गोंद लावून जाहिराती चिकटवल्याने बसचे मूळ स्वरूपच बिघडत आहे. परिणामी, बसचे सौंदर्य नष्ट होत असून स्वच्छतेवरही परिणाम होत आहे. या जाहिराती केवळ बसचे विद्रुपीकरण करत नाहीत, तर प्रवाशांची दिशाभूलही करतात. .एसटी महामंडळाच्या नियमानुसार कोणत्याही बसवर जाहिरात लावण्यासाठी संबंधित विभागाची पूर्वपरवानगी आणि निश्चित शुल्क भरणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरातींसाठी ठरावीक जागा निश्चित केलेल्या असतात. मात्र, सध्या दिसणाऱ्या जाहिराती पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे हा कायद्याने गुन्हा असून दोषींवर कारवाईची तरतूद आहे.या पार्श्वभूमीवर Maharashtra State Road Transport Corporation प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून बसेसमधील अशा स्टिकर्स काढून टाकण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

चालक व वाहकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, प्रवाशांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. बसमध्ये कोणी अशा जाहिराती चिकटवत असल्याचे आढळल्यास तात्काळ वाहक किंवा संबंधित आगाराला माहिती देणे आवश्यक आहे. तसेच अशा भ्रामक जाहिरातींना बळी न पडता विवेकाने निर्णय घेणे गरजेचे आहे.एसटी बस ही केवळ प्रवासाचे साधन नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे. त्यामुळे तिचे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित रूप जपणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच या प्रकाराला आळा घालता येणार असून ‘लालपरी’चे मूळ सौंदर्य टिकवणे शक्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news