

तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र तथा दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर दुसर्यांदा निवडून गेलेले आमदार योगेश कदम यांनी रविवारी (दि. 15) नागपूर येथे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या रूपाने दापोली मतदारसंघाला तब्बल 49 वर्षांनंतर मंत्रिपद आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.
खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांचा समावेश असलेल्या दापोली मतदारसंघात पहिल्यांदाच मंत्री पद येत आहे. यापूर्वीच्या दापोली विधानसभा मतदारसंघात सन 1975 मध्ये बाबुराव बेलोसे यांच्याकडे मंत्रिपद होते. बंदरे, मत्स्य, पर्यटन, दारूबंदी व उत्पादन शुल्क खाते होते. या मतदारसंघात सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खेड तालुक्यातील निम्मा भाग जोडला गेला. त्यानंतर युवा सेनेत कार्यरत योगेश कदम यांनी मतदारसंघात बांधणी सुरू केली. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनी शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना पराभूत करून या मतदारसंघावरील भगवा खाली उतरवला होता. मात्र, त्यानंतर सन 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत योगेश कदम यांनी संजय कदम यांना पराभूत करून शिवसेनेचा भगवा झेंडा या मतदार संघावर पुन्हा फडकवला. त्यानंतर शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या विभाजनात योगेश कदम शिंदेंच्या सोबत राहिले तर संजय कदम यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून उद्धव ठाकरे यांची साथ दिली. मात्र, सन 2024 मध्ये आ.योगेश कदम यांनी संजय कदम यांना दुसर्यांदा अस्मान दाखवत ते दापोलीचे आमदार झाले आहेत. त्यांना मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी नागपूर येथे पोहोचण्याचा फोन आल्यानंतर खेड, दापोली व मंडणगड मध्ये शिवसैनिकांमध्ये आनंदाची लाट पसरली.
यापूर्वी आ. योगेश कदम यांचे वडील शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहिले होते तर विधान परिषद सदस्य असताना राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे योगेश कदम यांच्या रूपाने खेड तालुक्यात तिसर्यांदा मंत्री पद लाभले आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघाला तब्बल 49 वर्षांनी राज्यमंत्री पद मिळत आहे. यापूर्वी सन1962 ते 1967, 1967 ते 1972 , 1972 ते 1978 व 1980 ते 1985 या काळात या मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे बाबुराव बेलोसे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. दापोली, खेड व मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी राज्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतल्याने खेड, दापोली व मंडणगडमध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दापोली येथे आल्यानंतर जनतेला आवाहन केले होते की, तुम्ही योगेश कदम यांना निवडून द्या त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी. त्या शब्दाची पूर्तता आज होत असल्याने शिवसैनिकांसाठी आजचा दिवस आनंद सोहळा आहे.
सचिन धाडवे, तालुकाप्रमुख शिवसेना खेड