Kiran Samant| पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांवर भर द्या!

आमदार किरण सामंत यांचे निर्देश; टंचाई कृती आराखड्याचे प्रस्ताव ३ ते ४ दिवसांत सादर करण्याची सूचना
Kiran Samant| पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांवर भर द्या!
Published on: 
Updated on: 

राजापूर : राज्य शासनाने राजापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला गती द्या. तालुक्यात जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्यावर भर द्या आणि पाणीटंचाई कृती आराखड्यासाठी आवश्यक कामांचे प्रस्ताव तीन ते चार दिवसांत सादर करा, असे निर्देश आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी दिले.

राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात आमदार सामंत यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पाणीटंचाई कृती आराखड्याची बैठक झाली. या बैठकीत संभाव्य टंचाईचा आढावा घेऊन त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला असून, त्यात राजापूरचाही समावेश आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वेळेत उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन सामंत यांनी केले.

बैठकीत धरणांमधील पाणीसाठा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कामे, कृषी विभागाच्या उपाययोजना तसेच जिल्हा परिषद कृषी विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे, पाणी साठवणुकीसाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी वाढवणे आणि टंचाई निवारणासाठी आवश्यक कामे तातडीने निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ग्रामपातळीवर आवश्यक कामे निश्चित करून त्यांचे प्रस्ताव तीन ते चार दिवसांत सादर करावेत. या प्रस्तावांच्या आधारे पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.तहसीलदार विकास गंबरे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या भातशेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन सामंत यांनी केले.

बैठकीला पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, माजी विधान परिषद सदस्य राजन तेली, राजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, प्रशासक, ग्रामसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news