रत्नागिरी : मिऱ्या गावातील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरचेरी परिसरात असलेली मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. गेले 4 दिवस नळपाणी योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मिऱ्या परिसराला एमआयडीसीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पांढरासमुद्र येथील टाकीत पाणी जमा हो ऊन ते पुढे पाईपलाईनद्वारे मिऱ्या परिसरात सोडले जाते.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. घरगुती वापरासह जनावरांसाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, अतिरिक्तखर्चाचा भार ग्रामस्थांवर पडत आहे. चार दिवस पाणी न असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, पाणीपुरवठा नेमका कधी पूर्ववत होणार, याबाबत ठोस वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
गुरूवारी पांढरासमुद्र येथील पाण्याच्या टाकीत 2 टंॅकरने पाणी साठवण्यात आले होते त्यानंतर मिऱ्या परिसरात पाणी पुरवठा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी दुरुस्ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे तातडीचा पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.