Ratnagiri News : मिरकरवाडा बंदरातील अवशेष बाहेर काढले

नौका शाकारून ठेवण्यासाठी जेटीवर जागा वाढण्यास झाली मदत
Ratnagiri News
मिरकरवाडा बंदरातील अवशेष बाहेर काढले
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरच्या मलबारी, समीना आणि डिझेल जेटीच्या समुद्रात बुडालेल्या जुन्या लाकडी नौकांचे अवशेष बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काही कार्यरत नौका शाकारण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. ज्या नौकांच्या मोडक्या केबीन बंदरावर काढून ठेवण्यात आल्या आहेत त्यांचीही विल्हेवाट लावली जाणार असल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे.डी.सावंत आणि मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाच्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी सांगितले. बंदरावर काढून ठेवण्यात आलेल्या डिंगीना हलवण्यासाठी काही दिवसांची मुदत देणार असल्याचेही मत्स्य व्यवसाय विभागाच्या या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिरकरवाडा बंदरावर मच्छिमार नौका उभ्या करण्यासाठी अनेक जेटी आहेत. यातील मलबारी क्र.४, समीना क्र.२ आणि डिझेल क्र.३ या जेटींच्या ठिकाणी समुद्रात अनेक जुन्या लाकडी नौका उभ्या करण्यात आल्या होत्या. वर्षानुवर्षे तशाच राहिलेल्या या नौका फुटून त्याचे अवशेष समुद्रात बुडून तसेच राहिले होते. त्यामुळे या जेटींवर पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात इतर पर्ससीन नेट नौका शाकारून ठेवता येत नव्हत्या. यासंदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे.डी.सावंत, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी दखल घेत कुठेकुठे अशाप्रकारे नौका बुडाल्या आहेत याची सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचवेळी बंदरावर काढून ठेवण्यात आलेल्या नौकांच्या जुन्या केबीन हलवण्याबाबतच्या नोटीसही त्याच केबीनवर चिकटवण्यात आल्या.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने सोमवारी पाहणी केल्यानंतर लगेचच मंगळवारी बुडालेल्या नौकांचे अवशेष बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. मिरकरवाडा बंदर प्राधिकरण अधिकारी अक्षया मयेकर यांनी बंदरावर उपस्थित राहून नियंत्रण ठेवले. जेसीबीच्या सहाय्याने बुडालेल्या नौकांचे अवशेष बाहेर काढण्यात आले. हे काम झाल्यानंतर बंदरावर काढून ठेवलेल्या मोडक्या केबीनची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

नुकतीच पर्ससीन नेट मासेमारी बंद झाली आहे. या पर्ससीन नेट नौकांच्या डिंगी किंवा छोट्या होड्या बंदरावरून हलवण्यासाठी काही दिवस सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही नौकांच्या चांगल्या केबीन दुरूस्तीसाठी बंदरावर काढून घेण्यात आल्या आहेत त्या हलवण्यासाठीही काही दिवस मुदत दिली जाणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news