

राजापूर : तालुक्यातील पूर्व परिसरात वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राम मेस्त्री आणि डॉ. डवरी अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, तेजेश दीपक रायबागकर (36, रा. पाचल बाजारपेठ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी तृप्ती रायबागकर यांना 30 मार्च 2024 रोजी पहाटे 3:30 वाजता प्रसूतीसाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तेथे कार्यरत असलेले डॉ. डवरी यांनी प्रकृती गंभीर असतानाही तृप्ती यांना वेळेवर दुसर्या रुग्णालयात रेफर केले नाही आणि सायंकाळपर्यंत रायपाटण रुग्णालयातच थांबवून ठेवल्याचा आरोप रायबागकर यांनी केला आहे.
याचदरम्यान, रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मेस्त्री हे त्यावेळी रुग्णालयात हजर नव्हते. त्यामुळे उपचारात दिरंगाई झाली. असा आरोप रायबागकार यांनी केला आहे. दरम्यान, पुढील उपचारार्थ आपल्या पत्नीला शासकीय रुग्णालयात न नेता एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिची प्रसृती झाली. मात्र उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. मात्र त्यावेळीही हलगर्जीपणा झाला होता. बाळाची एकूणच स्थिती लक्षात घेऊन त्याला प्रथम रत्नागिरी आणि तेथून कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र ते बालक दगावले होते.
डॉ. मेस्त्री आणि डॉ. डवरी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे पत्नीचे गर्भाशय काढावे लागले आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला, असे फिर्यादी तेजेश रायबागकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी 12 जून रोजी राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार राजापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 304(अ), 338, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.