

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील नुरानी गादी कारखाना व त्याच्या बाजूचे आर्य जनरल स्टोअर्स दुकानाला अचानकपणे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अकबर मोहम्मद नदाब (४९, रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, त्यांच्या कारवांचीवाडी येथील नुरानी गादी कारखान्याला बुधवारी मध्यरात्री आग लागली. यात २५० नग गादी, २५० नग उशी, ८ लोखंडी रॅक, ४ प्लास्टिक खुर्च्या, १ शिलाई मशिन, शटर, कारखान्याच्या छताचे पत्रे, विजेच्या वायर, २ फॅन, गादीचे चेक्स असलेले ६०० मीटर कापड असे अंदाजे ३ लाख ५० हजारांचे नुकसान झाले.
या गादी कारखान्याची आग बाजूच्या आर्य जनरल स्टोअर्स या दुकानात पसरल्यामुळे त्या दुकानातील फर्निचर, काऊंटर, विजेच्या वायर, तसेच दुकानातील माल जळून दुकान मालक आर्य पुसाळकर यांचे दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाले. या दोन्ही दुकानांचे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी गुरुवारी सायंकाळी पंचनामा केला. या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तपास पोलिस हवालदार प्रवीण पाटील करत आहेत.