

प्रवीण शिंदे
दापोली : महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांची आठवण आपण दरवर्षी अभिमानाने काढतो; त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी विविध कार्यक्रम, घोषणा, स्मारकांच्या कल्पना मांडल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्या हुतात्म्यांच्या गावांतील परिस्थिती पाहिली, तर वेगळेच वास्तव समोर येते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पहिले हुतात्मे सीताराम बनाजी पवार यांच्या माथेगुजर गावाकडे जाणारा रस्ता आजही दुरवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माथेगुजर हे हुतात्मा पवार यांचे मूळ गाव. त्यांच्या नावाने राज्यभर इतिहास सांगितला जातो, शाळांमध्ये त्यांची गाथा शिकवली जाते, तर मुंबईतील हुतात्मा चौकात १०६ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अखंड ज्योत तेवत असते. त्या नामावळीत पहिले नाव आहे ते सीताराम पवार यांचे. परंतु ज्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र घडला, त्यांच्या गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
माथेगुजरकडे जाणारा रस्ता लाटीमाळ येथून नानटे-चिंचवाडी मार्गे जातो. हा मार्ग अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांनी अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे, तर काही भागात मातीचा रस्ता असल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणेही धोकादायक ठरते. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या मार्गाची अवस्था आणखी बिकट होते. शाळकरी मुले, शेतकरी, रुग्ण यांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाही, ही चिंतेची बाब आहे.
हुतात्मा पवार यांच्या घराला भेट देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. मात्र खराब रस्त्यामुळे त्यांना येथे पोहोचताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ज्यांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य अर्पण केले, त्यांच्या गावात जाण्यासाठी साधा रस्ताही नसावा, हे दुर्दैव आहे, अशी खंत अनेक पर्यटक व्यक्त करतात. ग्रामस्थांच्या मते, अनेक वेळा प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मागण्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकांच्या काळात आश्वासने दिली जातात; स्मारक उभारण्याचे, रस्ता सुधारण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र निवडणुका संपल्यानंतर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या जातात; पण आधी गावाकडे जाणारा रस्ता तरी सुस्थितीत करावा, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करतात.
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी सीताराम पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत उडी घेतली होती. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे आंदोलना दरम्यान झालेल्या पोलिस गोळीबारात ते हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानासह १०६ जणांनी दिलेल्या हौतात्म्यामुळेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यामुळे त्यांच्या योगदानाचे महत्त्व अतुलनीय आहे. इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रात अशा हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम किंवा घोषणा पुरेशा नाहीत. त्यांच्या गावांचा विकास, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या घरापर्यंत सुस्थितीत रस्ता करणे, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.. माथेगुजरसारख्या ऐतिहासिक गावाकडे दुर्लक्ष होणे हे खेदजनक आहे. योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास हे गाव ऐतिहासिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उभे राहू शकते.
वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. पावसापूर्वी किमान तात्पुरती दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, कायमस्वरूपी डांबरीकरण करून समस्या निकाली काढावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. माथेगुजरच्या रस्त्याचा प्रश्न सोडवणे हीच हुतात्मा सीताराम पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.