Speed Boat : रत्नागिरीच्या सागरी सुरक्षा ताफ्यात स्पीड बोट दाखल

जुन्‍या बोटीवर १ कोटी रुपये खर्च; पोलिस दलाची गस्‍त अधिक वेगवान होणार
Speed Boat
रत्नागिरीच्या सागरी सुरक्षा ताफ्यात स्पीड बोट दाखल
Published on
Updated on

​रत्नागिरी : जिल्‍ह्याच्‍या किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिस दलाच्या ताफ्यात असलेल्‍या एका जुन्‍या स्‍पीड बोटची दुरुस्‍ती करुन ती नव्‍या जोमात दाखल झाली आहे. 1 कोटी रुपये खर्च करुन ही बोट अत्याधुनिक करण्‍यात आली आहे. या अत्याधुनिक स्पीड बोटीमुळे पोलिस दलाची गस्‍त अधिक वेगवान होणार आहे.

रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या शुभहस्ते या विशेष बोटीचे पूजन करून ती अधिकृतपणे पोलिस सेवेत दाखल करण्यात आली. या स्पीड बोटीमुळे रत्नागिरीच्या अथांग समुद्रात आता पोलिसांच्‍या गस्‍तीला वेग येणार आहे.

​रत्नागिरी जिल्ह्याला मोठा आणि संवेदनशील समुद्रकिनारा लाभला आहे. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा अबाधित राखणे हे पोलीस प्रशासनासमोरील मोठे आव्हान असते. यापूर्वी पोलीस दलाला 8 स्‍पीड बोट मिळाल्‍या होत्‍या. या स्‍पीड बोटी खराब झाल्‍याने त्‍या गस्‍तीसाठी कुचकामी ठरत होत्‍या. या बोटींच्‍या दुरुस्‍तीसाठी मोठा खर्च असल्‍याने टप्‍प्‍याटप्‍प्‍याने त्‍यांची दुरुस्‍ती होणार आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात एक बोट सहा महिन्‍यापूर्वी दुरुस्‍तीसाठी पाठवण्‍यात आली होती. ही बोट नव्‍या जोमाने पुन्‍हा पोलीस दलात दाखल झाली आहे.

नियमित सागरी गस्त घालण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन किंवा संकटकालीन परिस्थितीत समुद्रात तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी या बोटीचा प्रामुख्याने वापर केला जाईल. पावसाळ्यात किंवा वादळी हवामानात समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांच्या मदतीला धावून जाणे किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्वरित मदतकार्य सुरू करणे आता या वेगवान बोटीमुळे अधिक सोपे होणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बोटीच्या तांत्रिक क्षमतेची आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही बोट केवळ गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठीच नव्हे, तर किनारपट्टीवरील नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक भक्कम कवच ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. पोलिस दलातील या सुविधेमुळे रत्नागिरीकरांमध्ये आणि विशेषतः सागरी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली असून, रत्नागिरी पोलिस आता समुद्रातही शत्रूचा आणि संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news