Ratnagiri News : मंडणगड शहरात वाहतूक व्यवस्थेचे आव्हान

पार्किंग, खड्डे व महामार्गाचे काम ठरतेय डोकेदुखी; गणेशोत्‍सवात वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर
Ratnagiri News
मंडणगड शहरात वाहतूक व्यवस्थेचे आव्हान
Published on
Updated on

मंडणगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात येणार्‍या भाविक व पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. शहरातून सुरू असलेले महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम, नवीन रस्त्यावर होणारी बेशिस्त पार्किंग, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तसेच बसस्थानक परिसरातील खराब रस्त्यांची स्थिती यामुळे गणेशोत्सव काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवात मंडणगड तालुक्यात हजारो भाविक व पर्यटक दाखल होत असतात. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ, मुख्य चौक, बसस्थानक परिसर आणि महामार्गालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. अशा परिस्थितीत शहरात नियोजित पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला व नवीन काँक्रीट रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येते. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन करणेही प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी अथवा तात्पुरती पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांसाठी मुख्य चौकाजवळ तात्पुरता स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारल्यास वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते.

दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तसेच मुख्य चौक परिसरात असलेले खड्डे नागरिकांच्या समस्येत भर घालत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजविणे, परिसराची स्वच्छता करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची गरज

स्वच्छ व सुंदर मंडणगडची संकल्पना मांडली जात असताना शहरातील मुख्य चौक व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था ही स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात येणार्‍या भाविकांचे स्वागत स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहराने व्हावे, यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news