

रत्नागिरी : तालुक्यातील जांभारी येथे घराच्या कुंपणासाठी बांबू तोडत असताना जमिनीवर ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन एका महिलेच्या डाव्या हाताची पाचही बोटे तुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१९ मे) सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेश्मा प्रसाद सुर्वे ( ४७, रा. जांभारी, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. रेश्मा सुर्वे या पती प्रसाद सुर्वे यांच्यासोबत घराच्या मागील बाजूस असलेल्या‘भूताचा बंगला’ परिसरात घराच्या कुंपणासाठी बांबू तोडण्यासाठी गेल्या होत्या. बांबू तोडल्यानंतर प्रसाद सुर्वे तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी घरी गेले होते. दरम्यान, रेश्मा सुर्वे या जमिनीवर ठेवलेले बांबू उचलत असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्यांच्या डाव्या हाताची पाचही बोटे तुटून त्या गंभीर जखमी झाल्या. स्फोटाचा आवाज ऐकून प्रसाद सुर्वे घटनास्थळी धावून गेले.
त्यानंतर मित्रांच्या मदतीने परिसराची पाहणी केली असता जंगली जनावरे व पक्षी मारण्यासाठी ठेवण्यात आलेले अनेक गावठी हातबॉम्ब परिसरात विखुरलेले आढळून आले. जखमी रेश्मा सुर्वे यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधिक्षक बी बी. महामुनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.