Ratnagiri : मंडणगडमध्ये साडेचार किलो अमली पदार्थ जप्त
जालगाव : केळशी येथे सापडलेल्या चरस अमली पदार्थाबाबत आणखी मोठी माहिती समोर आली असून दापोली पोलिसांच्या पथकाने मंडणगड तालुक्यातील साखरी येथील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात लपवून ठेवलेल्या अमली पदार्थाच्या 4 पिशव्या जप्त केल्या असून, त्यांचे अंदाजे वजन 4.51 किलो असल्याची माहिती दापोली पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
दापोली पोलिसांच्या पथकाने 15 सप्टेंबर रोजी केळशी येथील किनारा मोहल्ला येथील अब्रार डायली याच्याकडून 4 लाख रुपये किमतीचा 998 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला होता. त्याच्यावर दापोली पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दापोली पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने अखिल होडेकर याने केळशी समुद्रकिनारी सापडलेल्या अमली पदार्थाच्या पिशव्यांपैकी 3 पिशव्या मला अब्रार डायली याने दिल्या तर उर्वरित 4 पिशव्या या स्वत:कडे ठेवल्याची माहिती अब्रार याने पोलिसांना दिली. त्या नंतर दापोली पोलिसांनी अखिल होडेकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे असलेल्या 4 अमली पदार्थांच्या पिशव्या या साखरी येथील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात टाकून दिल्याची माहिती दिल्यावर शनिवारी सकाळी दापोली पथक त्याला घेऊन साखरी येथे पोहोचले तेथे त्यांनी कांदळवनामध्ये जाऊन तपासणी केली असता पोलिसांच्या पथकाला 4 अमली पदार्थांच्या पिशव्या आढळून आल्या. पथकाने पंचनामा करून त्या त्याब्यात घेतल्या. दरम्यान, आतापर्यंतच्या दापोली पोलिसांच्या कारवाईत 22 लाख 92 हजार 400 रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, उपनिरीक्षक राजकुमार यादव, उपनिरीक्षक महेश पाटील, हेड काँ. मोरे, काँ. कर्देकर, देवकुळे, मडके आदी सहभागी झाले होते. या प्रकरणात एकूण दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी काही संशयितांची चौकशी सुरु असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक महेश पाटील करत आहेत.

