

रत्नागिरी : शहरातील दुकानांत महावितरणचे स्मार्ट मीटर दूरनियंत्रक किंवा रिमोटवर नियंत्रित करून वीज चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर महावितरण अधिकारी सतर्क झाले आहेत. हे रिमोट कोण बनवून देतो हा प्रश्न वीजचोरी ज्या दुकानात झाल्या त्या दुकानदारांना विचारण्यात आले, परंतु कोणत्याही दुकानदाराने रिमोट बनवणाऱ्याचे नाव सांगितले नाही. त्यामुळे वीजचोरी करण्यासाठी रिमोट बनवून देणाऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे. याबाबत पोलिसांची मदत घेण्याबाबतही विचार सुरू आहे.
रत्नागिरी शहरातील धनजी नाका परिसरातील दोन दुकानांमध्ये रिमोटद्वारे स्मार्ट वीज मीटरच्या युनिट रिडींगमध्ये छेडछाड झाल्याचे दिसून आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिमोटद्वारे होणारी वीजचोरी पकडली तेव्हा त्या दोन दुकानदारांकडे रिमोट कोण बनवून देतो याची विचारणा केली. परंतु दुकानदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वीज चोरी पकडणाऱ्या महावितरणच्या पथकाने अशाच प्रकारे होणाऱ्या वीज चोरीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
स्मार्ट मीटरमधील रिडींगमध्ये रिमोटद्वारे छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या दुकानदारांकडून जितक्या रकमेची वीजचोरी झाली त्याची बिलाची रक्कम वसूल केली आहे. त्याचबरोबर कायदेशीर कारवाई होवू नये म्हणून तडजोडीची दंडात्मक रक्कमही वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तडजोडीची प्रत्येकी 10 हजार रुपये रक्कम भरण्याची तयारी वीजचोरी करणाऱ्या दुकानदारांकडून अर्ज करून दाखवण्यात आली आहे. परंतु रिमोट कोण बनवतो याचा शोध कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. रिमोटवर वीज वापर युनिट नियंत्रित करणाऱ्यांना रिमोट कोण बनवून देतो याचा शोध घेण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये विचार सुरू आहे.