Ratnagiri News| महावितरणने उजळवली ५०० घरांची दिवाळी

४० खांब कोसळले, तरी जिद्द हरली नाही; मुचरी-तेरे परिसरात महावितरणने केला वीजपुरवठा सुरळीत
AI Photo
मुचरी-तेरे परिसरात महावितरणने केला वीजपुरवठा सुरळीत
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे अंधारात गेलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मुचरी आणि तेरे परिसरात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या पाच दिवसांत पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले. जोरदार वाऱ्यामुळे ४० विद्युत खांब कोसळून आठ रोहित्र बंद पडल्याने सुमारे ५०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दिवाळी आणि भाऊबीजेचा सण सुरू असतानाही स्वतःचा सण बाजूला ठेवत महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग पाच दिवस रात्रंदिवस मेहनत घेत वीजपुरवठा सुरळीत केला.

रविवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे तसेच झाडांच्या फांद्या पडल्याने संगमेश्वर तालुक्यातील मुचरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीवरील तब्बल ४० विद्युत खांब कोसळले, तर आठ रोहित्र बंद पडले. यामुळे मौजे तेरे आणि मुचरी येथील विविध वाड्यांमधील सुमारे ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला. या आपत्तीचा फटका मौजे तेरे येथील टाकेवाडी, कापलेवाडी, दळवीवाडी, भुरवणेवाडी आणि बौद्धवाडी, तसेच मौजे मुचरी येथील मोरवाडी, सुर्वेवाडी, गोरेवाडी, चांदेवाडी आणि गवळीवाडी या वाड्यांना बसला. याशिवाय मोबाईल टॉवर आणि विविध पाणीपुरवठा योजनांचाही वीजपुरवठा खंडित झाला होता.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांनी तातडीने दुरुस्तीच्या कामाची सूत्रे हाती घेतली. संबंधित वीजवाहिनी घनदाट जंगल आणि झाडीमधून जात असल्याने कोसळलेले खांब पुन्हा उभारणे, त्यांना ताण देणे, नवीन वीजवाहिन्या ओढणे आणि मार्गातील झाडा-झुडपांचे अडथळे दूर करणे, अशी अनेक आव्हाने कर्मचाऱ्यांसमोर होती. अशा या प्रतिकूल परिस्थितीतही काम पूर्ण करण्याचा निर्धार करत महावितरणच्या पथकाने सलग पाच दिवस, दिवस-रात्र काम करत वीज पुरवठा पूर्ववत केला. दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्याऐवजी या सर्वांनी ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश पोहोचविण्याला प्राधान्य दिले.

या कामात महावितरणचे जनमित्र रवी कदम, ओंकार कळंबटे, किशोर लाड, अंकेश गेले, राहुल धनावडे, विश्वनाथ जोशी, विलास भरणकर, अक्षय खानविलकर, किरण मोरे, विनिल काष्टे आणि रमेश कदम यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या समन्वयपूर्ण कामामुळे दुरुस्तीची मोहीम वेगाने पूर्णत्वास गेली. दुरुस्तीच्या कामात मुचरीच्या सरपंच रंजना जाधव तसेच ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.