

रत्नागिरी : महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रूग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा जुलै महिन्यापासून सार्वजनिक तसेच खासगी रूग्णालयांना मिळाला नव्हता. त्यामुळे निधीसाठी रूग्णालये प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, रत्न्ागिरी जिल्ह्याची थकबाकी 18 कोटींची आहे. एमपीजेएवायचे 1,162 कोटी मंजूर झाले असून त्यातून रत्नागिरी जिल्ह्याला कधी आणि किती निधी मिळणार, हे प्रत्यक्षात निधी आल्यानंतरच कळणार आहे. एकंदरीत निधी मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील सार्वजनिक, खासगी रूग्णालयांना कोट्यवधीचा परतावा मिळणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेंतर्गत असलेल्या रूग्णालयांचे दावे निकाली काढण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदीनुसार 1 हजार 162 कोटी 8 लाख 63 हजार 321 रूपये इतका निधी राज्य आरोग्य हमी आरोग्य हमी सोसायटीकडे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून दरवर्षी हजारो रूग्ण या योजनेतून उपचार घेतात. या योजनेतून सरकारच्यावतीने खासगी, सार्वजनिक रूग्णालयांना उपचारांच्या परतावा मिळत असतो.
मागील जुलै महिन्यापासून हा परतावा मिळालेला नव्हता. जिल्ह्यासह राज्यातील सार्वजनिक रूग्णालयांनी कोट्यावधी रूपये थकल्याच्या तक्रारी वाढत होत्या. समन्वयाकडे संपर्क करूनही तोडगा निघाला नव्हता. सार्वजनिक रूग्णालये आलेल्या कोणत्याही रूग्णाला विनाउपचार पाठवत नाहीत. त्यामुळे ते आर्थिक भार घेवूनही वैद्यकीय उपचार देताता. योजनेचा परतावा 45 दिवसांच्या आत मिळत नसल्यामुळे या योजनेंतर्गत उपचार करण्यास अनेक खासगी रूग्णालयांनी नकार दिला किंवा अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तक्रारी वाढत असल्यामुळे योजना कशा राबवणार, हा प्रश्न होता. सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरलेली महात्मा फुले योजना निधीच्या टंचाईत अडकली असल्यामुळे खासगी रूग्णालये निधीसाठी सरकारकडे मागणी करत आहे.