

माखजन : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वर्षानुवर्षे सुरू असतानाच माभळे आणि संगमेश्वर परिसरातील महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते अद्याप अपूर्णच आहेत. रस्त्यांची अर्धवट कामे, अपूर्ण गटारे आणि अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजनांमुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गांवरून प्रवास करणे धोकादायक बनले असून एखाद्या मोठ्या अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि बांधकाम सुरू आहे. मात्र, महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट सोडण्यात आली आहेत, तर गटारांचे बांधकामही मध्येच थांबवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचणे, चिखल निर्माण होणे आणि वाहनांना मार्ग काढताना अडचणी येणे असे प्रकार घडत आहेत. अर्धवट कामांच्या ठिकाणी आवश्यक सूचनाफलक, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक चिन्हांचा अभाव असल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याची स्थिती लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वीही या परिसरात अपघात घडले असताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
संगमेश्वर पोलिस ठाण्यासमोरील महामार्गाच्या कामाची गतीही संथ आहे. या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन सातत्याने बदलत असल्याने वाहनचालक संभ्रमात पडत आहेत. काहीवेळा एकेरी वाहतूक सुरू केल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना स्थानिक जोडरस्त्यांची कामे मात्र रखडली आहेत. कामाचा दर्जा, गती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. ठेकेदाराकडून कामात विलंब होत असताना संबंधित यंत्रणा कारवाई का करत नाही, अशीही विचारणा होत आहे.
माभळे व संगमेश्वर परिसरातील सर्व जोडरस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अपूर्ण गटारांची कामे मार्गी लावावीत, बंद रस्ते सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुले करावेत आणि पोलिस ठाण्यासमोरील महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि स्पष्ट सूचनाफलक लावून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी. राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराला काम पूर्ण करण्याची निश्चित मुदत द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. चौपदरीकरण कधी पूर्ण होणार, हा प्रश्न कायम असतानाच महामार्गाला जोडणारे स्थानिक रस्ते तरी कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल माभळे व संगमेश्वर परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.