

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे सोमवारी रात्री ११ वाजता एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामुळे टँकरमधून गॅस गळती सुरू झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. मंगळवारी (दि.२९) दुपारपर्यंत वाहतूक बावनदी ते पाली या पर्यायी मार्गावर वळवण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या प्रकरणी टँकर चालक सय्यद खाजा पाशा (वय ५०, रा. हैदराबाद) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातखंबा गावचे पोलिस पाटील औकित सखाराम तारवे यांनी तक्रार दाखल केली आहे. चालकाचा टँकर (एपी-३९-टीएफ-०१५७) जयगडहून कोल्हापूरकडे जात असताना वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, टँकरचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त टँकर सरळ करण्याचे आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.