Ratnagiri News : स्थानिकांना टोलमाफी करा, अन्यथा आंदोलन

सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांना सर्वपक्षियांसह नागरिकांचा निवेदनाद्वारे इशारा
Ratnagiri News
राजापूर : सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांना निवेदन देताना नागरिक.
Published on
Updated on

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील येथे टोल वसुली पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे. टोल सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत स्थानिकांना टोलमाफी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कुमावत यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सकाळपासून तालुक्यातील विविध भागांतून नागरिक हातिवले येथे जमा झाले. यावेळी नागरीकांकडून रस्ते कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून अनेकठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. यामुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी. निकृष्ट दर्जाचा रस्ता देऊन आता टोल वसुली करणे म्हणजे कोकणवासियांची पिळवणूक आहे. यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी येथे टोल सुरू करण्यात आला होता; मात्र स्थानिकांच्या आंदोलनामुळे तो बंद करण्यात आला होता. आता पुन्हा टोल सुरू करण्याच्या हालचालींमुळे सर्वपक्षियांनी एकत्र येत आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.

महामार्गावरील अनेक गंभीर त्रुटी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. काम अपूर्ण असून वारंवार अपघात होत आहेत. भू-संपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. अनेकठिकाणी शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले असून पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत. तसेच सर्व्हीस रोड, बस स्टॉप, पिकअप शेड, स्ट्रीट लाईट, वृक्षलागवड यांसारखी कामे अपूर्ण असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अपघाताच्या प्रसंगी रुग्णवाहिका, क्रेन, शौचालय, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची गंभीर बाबही निदर्शनास आणून देण्यात आली. हातिवले मार्गावरून राजापूर शहरात नागरिकांना दैनंदिन कामासाठी वारंवार ये-जा करावी लागते. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, शासकीय कार्यालये, बाजारपेठेसाठी दिवसातून अनेकवेळा हा मार्ग वापरावा लागतो. त्यामुळे टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news