

देवरुख : संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर अचानक विद्युतवाहिनी तुटून पडल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत बसच्या वाहकाला विजेचा जोरदार धक्का बसून किरकोळ दुखापत झाली, तर चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला. बसमध्ये एकच प्रवासी असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर एका स्टॉलजवळ घडली.
चालक रवींद्र साप्ते हे सकाळी ७ वाजता संगमेश्वर बसस्थानकातून एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची उमरे एसटी घेऊन निघाले होते. बस फणसवणे येथील उमरे फाट्यावर पोहोचली असता रामदास मिसळ स्टॉलजवळील विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण तुटल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विद्युतप्रवाह असलेली वाहिनी अचानक थेट सुरू असलेल्या एसटी बसवर कोसळली. विद्युतवाहिनी बसवर पडताच वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा जोरदार धक्का बसला. मात्र त्यांनी प्रसंगावधान दाखवत सीटचा आधार घेतला. त्याचवेळी विद्युतप्रवाह बंद झाल्याने मोठा अनर्थ टळला आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली.
चालक रवींद्र साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत असल्याने ते विजेच्या थेट संपर्कात येण्यापासून बचावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळविले. त्यानंतर लाईनमन होडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.