Ratnagiri Leopard Sighting| माचाळात बिबट्यांचा ‘सन बाथ’

दोन पिल्लेही सोबत; पर्यटकांनी टिपले फोटो; व्हिडीओ व्हायरल
Leopard Sighting
माचाळात बिबट्यांचा ‘सन बाथ’
Published on: 
Updated on: 

लांजा : लांजा तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माचाळ येथे वन्यजीवांचा अधिवास पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. गुरुवारी सकाळी कोचरी-माचाळ मार्गावर मादी बिबट्या दोन पिल्लांसह दिसून आला. सकाळच्या कोवळ्या उन्हात रस्त्यावर फिरणाऱ्या बिबट्या आणि त्याच्या पिल्लांचे दर्शन काही पर्यटकांना घडले. पर्यटकांनी या दृश्याचे फोटो आणि व्हिडीओ टिपले असून दिवसभर ते समाजमाध्यमांवर प्रसारित होत होते.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि घनदाट वनराईत वसलेल्या माचाळ परिसरात वन्यजीवांची वर्दळ पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. गुरुवारी सकाळी रस्त्यावर बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचे दर्शन घडल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बिबट्या आणि पिल्ले रस्त्यावर फिरताना, तसेच झाडांवर दिसल्याचे पर्यटकांनी सांगितले. त्यांच्या छायाचित्रांसह व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

समुद्रसपाटीपासून उंचीवर वसलेले माचाळ गाव निसर्गसौंदर्य, थंड हवा, घनदाट वनराई आणि शांत वातावरणामुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. प्रसिद्ध मुचकुंद ऋषींची गुहा देखील माचाळ येथे आहे. पूर्वी दुर्गम भागात वसलेल्या या गावात पोहोचण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्याने पर्यटकांना अडचणी येत होत्या. गेल्या सहा-सात वर्षांत माचाळची पर्यटनस्थळ म्हणून ओळख वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.