

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई-गोवा महामार्गांनजीक असलेल्या मधुकर कुंभार यांच्या कोंबड्याच्या खुरड्यात शिकारीसाठी शिरलेला बिबट्या हा त्याच खुराड्यात अडकल्याची घटना रविवार सकाळी साडेसहा वाजता घडली.
मधुकर कुंभार यांचा मुलगा अवधूत हे कुक्कट व्यवसाय करतात. त्यासाठी बांधण्यात आलेल्या घरात घुसून बिबट्या नेहमी कोंबड्या फस्त करत होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे रविवार सकाळी साडेसहाच्या सुमारास हा बिबट्या या खुराड्यात घुसला व यातील काही कोंबड्या फस्त केल्या. याची चाहूल अवधुत याला लागताच त्याने धाव घेतली. तेथे पाहिले असता आत बिबट्या असल्याचे लक्षात येताच मागे सरकत प्रसंगावधान राखत खुराड्याचा दरवाजा त्याने बंद केला व बिबट्या आत कैद झाला. यावेळी बिबट्याने खुरड्यातील अनेक कोंबड्या फस्त केल्याचे समजते. तत्काळ याची खबर वन विभाग व संगमेश्वर पोलीस ठाण्याला देण्यात आली. खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे त्याचे सहकारी कॉन्स्टेबल संदेश जाधव, सोमनाथ खाडे , गिरप्पा लोखंडे , सिद्धेश आंबरे अरुण वानरे, रमेश गावित यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. वन विभागाचे वनपाल न्हानू गावडे हे आपले सहकारी वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुप्रिया काळे, किरण पाचर्णे, शर्वरी कदम यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे, पोलीस पाटील वर्षा सुर्वे, आप्पा पाध्ये, संजय ओकटे ग्रा. पं. सदस्य रामचंद्र हरेकर, अरविंद जाधव, कृष्णा हरेकर, दिलीप सावंत आदी उपस्थित होते. बिबट्या खुराड्यात बंदिस्त झाल्याने आक्रमक झाला होता. त्याला जेरबंद करणे वन विभागासाठी कठीण होऊन बसले होत. मात्र, वनपाल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंजर्यात कैद करण्यास वन विभागाला यश आले. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. संगमेश्वर पोलिसांच्या पथकाने पोलिस निरीक्षक रामचंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दी आटोक्यात आणली.