

लांजा : लांजा शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना उबाठा युवा सेनेने स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांत चिखल नांगरणी करून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. बैलगाड्यांसह करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधूले. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा युवा सेनेने दिला.
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. कुक्कुटपालन केंद्रापासून तहसील कार्यालयापर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून, पादचारी आणि स्थानिक नागरिकांनाही या दुरवस्थेचा फटका बसत आहे. महामार्गाबरोबरच लांजा शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था खड्डेमय झाली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा तालुका युवा अधिकारी अभिजित राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाड्यांसह चिखल नांगरणी स्पर्धाही घेण्यात आली. या अनोख्या आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, अल्लाउद्दीन नेवरेकर, शहराध्यक्ष मोहन तोंडकरी, लक्ष्मण मोर्ये, राजू सुर्वे, बाबू गुरव, बाबा धावणे, चंद्रकांत शिंदे, मांडवकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लांजा शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही युवा सेनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनामुळे लांजा शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.