

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 30 कोटी 9 लाख 16 हजार 838 रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच एका झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे लांजा शहराच्या विकासासाठी अधिक चालना मिळणार आहे.
लांजा शहराच्या विकासाला गती देणारा आणि मूलभूत सुविधांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे लांजा शहराच्या नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी सांगितले. लांजा नगरपंचायतीच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजुरीच्या बैठकीला नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्यासह उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, मुख्याधिकारी अभिजित कुंभार तसेच सर्व नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध योजनांवर भर देण्यात आला. नगरपंचायतीत मंजूर अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर वस्ती विकास योजना, तसेच शहरातील रस्ते दुरुस्ती व बांधकाम, पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करणे, गटारे बांधकाम व स्वच्छता व्यवस्थेचे सुधारणा कामे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर नगरपंचायतीने विशेष भर दिल्याचे दिसून येते.
या अर्थसंकल्पातून शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना प्राधान्य दिल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच महसुली व भांडवली खर्चाचे सुयोग्य नियोजन करत नागरिकांना मूलभूत सेवासुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्याचा आराखडा यावेळी मांडण्यात आला असून येणाऱ्या आर्थिक वर्षात शहराच्या विकासाला गती देण्याचा विश्वास यावेळी नगरपंचायत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
या नवीन अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नसल्याने लांजावासीयांना दिलासा मिळाला आहे. एकूणच विकासकामांना गती देतानाच नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये याची देखील काळजी नगरपंचायतीने घेतली आहे. या अर्थसंकल्पामुळे लांजा शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होवून विविध विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा नगरपंचायत प्रशासनाकडून व्यक्तकरण्यात आली आहे.