

रत्नागिरी ः लांजा तालुक्यातील कुर्णे येथील सुरेश रामचंद्र पडये (45, रा. कुर्णे, लांजा) या प्रौढाच्या खून प्रकरणातील संशयिताच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या. शिवीगाळ केल्याच्या रागातून हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नंदुमार रवींद्र पांचाळ (25, रा.कुर्णे सुतारवाडी, लांजा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सोमवारी (दि. 19 जानेवारी) सुरेश पडये यांचा त्यांच्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याबात लांजा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; परंतु मृत सुरेश पडयेच्या अंगावर असलेल्या जखमा तसेच घटनास्थळावरील सांडलेल्या रक्तावरून हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे,अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नियुक्त करुन त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले,सहाय्यक पोलिस फौजदार सुभाष भागणे, पोलिस हेड काँस्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील आणि चालक पोलिस काँस्टेबल अतुल कांबळे यांनी केली आहे.
शिवीगाळच्या रागातून खून केल्याची कबुली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळाचे निरीक्षण केले. त्याआधारे हा मृत्यू नैसर्गिक नसल्याच्या संशयावरून परिसरामध्ये सखोल चौकशी व तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी नंदकुमार पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र मृत सुरेश पडये याने आपल्याला शिवीगाळ केल्याच्या रागातून मनात राग धरत घरामध्येच त्याला जीवे मारल्याची कबुली दिली.