

लांजा : तालुक्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून चार महिन्यांपासून वृक्षतोड प्रकरणे बंद होती. तालुक्यातील अनेकठिकाणी वृक्षतोड केलेल्या लाकडांचे मोठे ढीग नागरिकांच्या नजरेस पडत आहेत. त्यामुळे खरंच वृक्षतोड बंद आहे का? असा सवाल वृक्षप्रेमी व सुज्ञान नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. राजरोसपणे सुरू असणाऱ्या वृक्षतोडीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष व जबाबरदार असल्याने तालुक्यात वृक्षतोड झपाट्याने वाढली आहे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
तालुक्यात वन विभागाच्या अखत्यारीत खोरणीनको, पन्हळे, चिंचुर्टी, प्रभानवल्ली, कुरंग, कुवे, कुर्णे, हर्चे, बेनीबुद्रूक, केळंबे, गोळवशी, कोर्ले, लांजा व अन्य ठिकाणी वन विभागाची राखीव नियत व वनक्षेत्र आहेत. मात्र या क्षेत्रांच्या जवळपास असणाऱ्या व तालुक्याच्या पूर्व भागात सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये असणार्या मोठमोठ्या वनराईवर कुऱ्हाड चालविल्याने जुनाट वृक्ष गायब झाले आहेत. परिणामी येथील डोंगरकडे ओसाड पडू लागले आहेत. या वृक्षतोडीला कोणाचे अभय? व कोणत्या पासद्वारे लाकूड वाहतूक केली जाते? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तालुक्यातील अनेक शेतकरी हे आपल्या विविध कामांसाठी, कारणांसाठी झाडतोड करतात. मात्र या झाडतोडीसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे महसूल विभागामार्फत तलाठ्यांकडून दिली जातात. जानेवारीपासून अचानकपणे महसूल विभागाकडून शेतकर्यांना वृक्षतोडीसाठी दिली जाणारी कागदपत्रे थांबवली आहेत. महसूलकडून सातबारावर वृक्ष नोंदी केल्या जात नाहीत. काही दाखले देता येत नाहीत. अशाप्रकारे वृक्षतोड प्रकरणे बंद असतानाही तालुक्यातील विविध गावांमध्ये सद्यस्थितीत बेसुमार वृक्षांची कत्तल केली जात आहे.
पावसाळा सुरू होणार असल्याने साठवलेला लाकूड साठा कोल्हापूर, सांगलीच्या दिशेने वाहून नेला जातो आहे. लांजा तालुक्यातून लांजा-कोल्हापूर मार्गावर लाकूडसाठा वाहून नेणारे ट्रक दिवसा व रात्री नजरेस पडत आहेत. त्यामुळे वृक्षतोड प्रकरणे बंद असतील तर ही वृक्षतोड कशी होते, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे..