

खेड : तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीमुळे मुंबईच्या दिशेने जाणारा मुख्य मार्ग माती व दगडांनी पूर्णपणे अडला असून, वाहतूक एकाच लेनवरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहनांची वर्दळ विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या ठिकाणी काही दिवसांपूर्वीही जोरदार पावसामुळे दरड कोसळली होती. त्याच परिसरात मंगळवारी पुन्हा दरड कोसळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सकाळी दरड कोसळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खेड तालुका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरड हटवण्यासाठी जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, दोन्ही लेनवरील वाहतूक पूर्ववत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तोपर्यंत वाहनांची वाहतूक एकाच लेनवरून चालू ठेवण्यात येत आहे. परिणामी महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दरड कोसळण्याचा धोका अद्याप कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनचालकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या मार्गावरून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगावी व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.