

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा | Ratnagiri Doctor Harassment
साताऱ्यातील फलटण येथे एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. राजकीय पुढाऱ्याच्या मानसिक छळामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. याच धर्तीवर, रत्नागिरी जिल्ह्यातही असाच एक गंभीर प्रकार होता होता टळल्याचे समोर आले आहे. एका आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी यांनी राजकीय पुढाऱ्याच्या त्रासाला कंटाळून थेट राजीनामा दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
धामापूर येथील आरोग्य केंद्रातील प्रकार
मागील महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे देवरुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने अचानकपणे राजीनामा दिला. या महिला अधिकाऱ्याची आरोग्य सेवा उत्तम होती आणि त्यांचा जनसंपर्कही चांगला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने परिसरातील ग्रामस्थांना धक्का बसला आणि परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली. अखेर, ग्रामस्थांनी एक विशेष सभा बोलावून या महिला डॉक्टरला राजीनाम्यामागचे नेमके कारण विचारले.
यावेळी महिला डॉक्टरने धक्कादायक कारण सांगितले. एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. हा प्रकार ऐकून उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राजकीय पुढाऱ्याची चमकेगिरी आणि माफी
या प्रकरणातील राजकीय पुढारी हा नेहमीच 'चमकेगिरी' करणारा आणि प्रत्येक कार्यक्रमात पुढे असणारा होता. विशेष म्हणजे, या आरोग्य केंद्राशी त्याचा प्रत्यक्ष संबंध सतानाही तो हस्तक्षेप करत होता. ग्रामस्थांनी त्वरीत त्या राजकीय पुढाऱ्याला बैठकीला बोलावले. बैठकीत त्याने आपली चूक मान्य केली आणि महिला डॉक्टरची माफीही मागितली. यामुळे महिला डॉक्टरने आपला राजीनामा मागे घेतला होता.
तरीही त्रास सुरूच...
या नाट्यमय घडामोडीनंतरही, स्वतःला 'सामाजिक कार्यकर्ता' म्हणवणाऱ्या या राजकीय पुढाऱ्याने अप्रत्यक्षरित्या महिला डॉक्टरला त्रास देणे सुरूच ठेवले. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर त्या महिला डॉक्टरांनी पुन्हा एकदा राजीनामा देण्याचा आणि नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
गावात डॉक्टर कोण येणार?
या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रातील समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. मुळातच खेडेगावांमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर सहजासहजी मिळत नाहीत. जिल्ह्यात आजही आरोग्य केंद्रांमध्ये अनेक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत जर राजकीय पुढाऱ्यांकडून अशा प्रकारे मानसिक त्रास दिला जात असेल, तर ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर कोण येणार, असा गंभीर सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.
या पुढाऱ्याने महिला डॉक्टरांना मानसिक त्रास देण्यामागचे कारणही वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. या पुढाऱ्याची एक मैत्रिण आरोग्य सेविका असून, ती वारंवार आपल्या कामात कसूर करत होती आणि दिवसभर देवरुख शहरात बसून राहत होती. महिला वैद्यकीय अधिकारी या आरोग्य सेविकेला तिच्या गैरहजेरीबद्दल जाब विचारत असत. हाच धागा पकडून आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी आणि तिच्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्या पुढाऱ्याने महिला डॉक्टरला त्रास देण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.