

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदा एलईडी प्रकाशातील मासेमारी आणि अनधिकृत पर्ससीन मासेमारी रोखण्याची जबाबदारी असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाकडे सध्या गस्तीसाठी सक्षम नौकाच नसल्याने कारवाईला मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजित ऊर्फ छोट्या भाटकर यांनी स्वतःच्या दोन नौकांपैकी एक नौका नवीन गस्ती नौका उपलब्ध होईपर्यंत विनामोबदला वापरण्यास देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, अवैध मासेमारी करणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई होण्याची ग्वाही मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
जिल्ह्याच्या समुद्रात एलईडी दिव्यांच्या साहाय्याने बेकायदा मासेमारी करून पारंपरिक मच्छीमारांच्या हक्काची मासळी पकडली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. याची दखल घेत मत्स्य व्यवसाय विभागाचे अतिरिक्त सहआयुक्त महेश देवरे आणि उपायुक्त नागनाथ भादुले यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून नियमित कारवाईचे आदेश दिले. मात्र, एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांचा माग काढण्यासाठी समुद्रात गस्त घालावी लागते. विभागाकडे योग्य गस्ती नौका नसल्याने कारवाईत अडथळे येत आहेत.
‘शारदा’ परत; ‘रामभद्रा’बाबतही सुरक्षिततेचा प्रश्न सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडे असलेली ‘शारदा’ ही गस्ती नौका परत करण्यात आली आहे. या नौकेचा वेग ताशी ९ ते १० नॉटिकल मैल इतकाच होता. समुद्रातील लाटांमुळे नौकेला मोठे हेलकावे बसत असल्याने गस्ती पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच नौकेत बिघाड निर्माण झाल्याने ती परत पाठवण्यात आली.त्यानंतर ‘रामभद्रा’ ही गस्ती नौका उपलब्ध करून देण्याबाबत मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाकडून कार्यवाही सुरू झाली. मात्र, ही नौका फायबरची असल्याने मोठ्या लोखंडी मासेमारी नौकांजवळ जाताना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या सक्षम गस्ती नौकेची मागणी करण्यात आली असून, त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सक्षम गस्ती नौका आणि नियमित कारवाई उपलब्ध झाल्यास पारंपरिक मच्छीमारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.