Ratnagiri News : कुर्धे सड्यावरील खांबतळे संवर्धन काम ठप्प

ठेकेदाराने पलायन केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त; 50 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
Ratnagiri News
कुर्धे सड्यावरील खांबतळे संवर्धन काम ठप्प
Published on
Updated on

पावस : तालुक्यातील कुर्धे सड्यावरील खांबतळे संवर्धन व सुशोभिकरणाचे काम 50 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने अचानकपणे कामगार व यंत्रसामग्री हलवून काम अर्धवट सोडून पलायन केल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

युद्धपातळीवर सुरू असलेले हे काम गेल्या आठ दिवसांपासून ठप्प असून तळ्याभोवती मोठ्या प्रमाणात दगड, जाळ्या व बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडून आहे. या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ऑक्टोबरपासून या कामाला सुरुवात झाली होती. तळ्याच्या चारही बाजूंनी खोदकाम करून दगडी भिंती उभारण्यात येत होत्या. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होऊन गाळ काढण्यास मदत होईल, असा ग्रामस्थांचा विश्वास होता. मात्र काम अर्धवट सोडल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

परिसरात बांधकाम साहित्य तसेच प्लास्टिकच्या जाळ्या टाकून दिल्याने पर्यावरणीय व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोका निर्माण झाला आहे. हे ठिकाण ग्रामस्थांसाठी विरंगुळ्याचे केंद्र बनेल, अशी अपेक्षा होती; परंतु सध्याची अवस्था त्रासदायक ठरत आहे. याच परिसरात 2021 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. दोन बोरवेल, पाण्याची टाकी व पाईपलाईन टाकण्यात आली; मात्र 2024 पासून ते कामही अर्धवट अवस्थेत आहे. तीन वर्षांपासून खोदकामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. आता तळ्याचे कामही त्याच मार्गावर जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत स्थानिक ग्रामस्थ सुरेश पानगले म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून नळपाणी योजनेचे काम रखडले आहे. आता तळ्याचे संवर्धनाचे कामही अर्धवट सोडले गेले. शासनाचा निधी वाया जात असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काम तातडीने पूर्ण करावे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दोन्ही कामे तातडीने पूर्णत्वास न्यावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news