

खेड : कुणबी समाजातील अनिष्ट प्रथा, कालबाह्य रूढी तसेच विवाह, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये होणार्या अनावश्यक आणि अवाजवी खर्चाला आळा घालून समाजामध्ये सकारात्मक व विधायक बदल घडवून आणण्याचा निर्धार लवेल विभागातील कुणबी समाजाच्या सभेत करण्यात आला. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साधेपणा, बचत आणि प्रगतशील विचारांना प्राधान्य देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या माध्यमातून कुणबी समाजोन्नती खेड मुंबई व ग्रामीण, कुणबी युवा खेड तसेच कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जून रोजी कुणबी समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा आणि विविध समारंभांमध्ये होणार्या अवाजवी खर्चाबाबत सविस्तर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय व ठराव मांडण्यात आले होते. या ठरावांची अंमलबजावणी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावी, यासाठी विभागनिहाय सभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून लवेल विभागाच्या आयोजित सभेत समाजातील वर्तमान परिस्थिती, भविष्यातील वाटचाल, विवाह सोहळ्यांमधील वाढता खर्च, सामाजिक प्रतिष्ठेसाठी होणारा अनावश्यक खर्च तसेच कालबाह्य प्रथा-परंपरा याबाबत समाजबांधवांनी आपली मते मांडली. वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार पडत असून, अनावश्यक प्रथा-परंपरांना फाटा देऊन साधेपणाने कार्यक्रम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
वाचविलेली आर्थिक साधने समाजातील तरुण पिढीच्या शिक्षण, रोजगार, व्यवसायासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयोगात आणण्याचा संदेशही या सभेतून देण्यात आला. समाजातील तरुणांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे, महिलांचा सामाजिक व आर्थिक सहभाग वाढविणे आणि समाजातील एकोपा अधिक मजबूत करणे या विषयांवरही चर्चा झाली. केवळ ठराव करून न थांबता प्रत्येक समाजबांधवाने सकारात्मक बदलाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सभेला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, सचिव सचिन गोवळकर, खजिनदार सुधीर वैराग, सेवा संघ लवेल विभागाचे अध्यक्ष दीपक शिगवण यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.