

रत्नागिरी : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या कथित प्रयत्नाविरोधात रत्नागिरीत ओबीसी-कुणबी समाजाने सोमवारी तीव्र निदर्शने केली. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात रत्नागिरी तालुक्यातील शेकडो ओबीसी-कुणबी बांधव, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जयस्तंभ येथून सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या शांततापूर्ण मोर्चाने रत्नागिरी तहसीलदार कार्यालयापर्यंत चालत जात, आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामावून घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप कुणबी समाजाने केला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर मोठा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करत, महाराष्ट्रातील सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी, आंदोलनाचे नेतृत्व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रत्नागिरीच्या पदाधिकार्यांनी केले. त्यांनी समाजाला एक दिवस समाजासाठी या भावनेने एकत्र येण्याचे आवाहन करत, आपल्या हक्कासाठी लढणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या निदर्शनामध्ये रत्नागिरी अध्यक्ष रामभाऊ गराटे, सचिव विनायक यशवंत शिवगण, खजिनदार गजानन धनावडे, युवाअध्यक्ष सागर कळबंटे, महिला अध्यक्षा विनया गावडे, साक्षी रावणांग यांच्यासह तानाजी कुळये, शांताराम मालप, अॅड. महेंद्र मांडवकर यांसह सर्व उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य, तसेच ओबीसी संघर्ष समितीचे राजीव कीर, दीपक राऊत, बसपा चे राजेंद्र आयरे आदी ओबीसी नेते मंडळी उपस्थित होते. त्यांनी ओबीसी आरक्षणाचा हक्क टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले.