

रत्नागिरी : मुंबई आणि उपनगरांची वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी कोकणातील कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी (अवजल) मुंबईकडे वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर शासकीय स्तरावर हालचाली वेगाने सुरू आहेत. केंद्र सरकारच्या वॅपकॉस लिमिटेडमार्फत या प्रकल्पाचे अत्याधुनिक तांत्रिक सर्वेक्षण सुरू असले तरी प्रचंड आर्थिक खर्च, सह्याद्रीतील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय अडचणींमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यापूर्वीच रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनीही या शक्यतेला दुजोरा दिला आहे. चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी सध्या वाशिष्ठी नदीत सोडले जाते. हे पाणी भुयारी बोगदे आणि मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईपर्यंत नेण्याची तांत्रिक साध्यता तपासली जात आहे. त्यासाठी वॅपकॉस लिमिटेडकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण सुरू आहे.
या प्रकल्पासाठी लायडर सर्वेक्षण करण्यात येत असून, लेसर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोफळी ते मुंबईदरम्यानच्या संपूर्ण भूप्रदेशाचा त्रिमितीय नकाशा तयार केला जात आहे. याशिवाय, प्रस्तावित बोगद्यांच्या मार्गावरील खडकांची स्थिरता तपासण्यासाठी बोरिंग चाचण्या, भूगर्भीय अभ्यास तसेच वनक्षेत्र आणि जमिनींचे सविस्तर सर्वेक्षणही सुरू आहे. मात्र या प्रकल्पासमोर अनेक गंभीर आव्हाने आहेत.
कोकण ते मुंबई हे शेकडो किलोमीटरचे अंतर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, लांबलचक बोगद्यांची उभारणी आणि पाणी उंच भागातून पुढे नेण्यासाठी आवश्यक असणारी उच्च क्षमतेची पंपिंग यंत्रणा यामुळे प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प शासनासाठी मोठे आव्हान ठरू शकतो.