Ratnagiri News : जाचक अटींवरून कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती आक्रमक

निगेटिव्ह मार्किंग; शारीरिक चाचणी रद्द करण्याची मागणी
konkan railway
konkan railway file photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी आगामी भरती प्रक्रियेत लागू करण्यात आलेल्या जाचक अटींवरून कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती आक्रमक झाली आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी निगेटिव्ह मार्किंगची पद्धत तसेच शारीरिक चाचणी रद्द करावी, अशी मागणी समितीने केली असून मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी (दि. १२) झाली. बैठकीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त सभासद तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी समितीने २०१० पासून सातत्याने संघर्ष केला आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष झा यांनी प्रकल्पग्रस्त उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत वाढविणे तसेच १२/२ च्या नोटीसनुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेत अधिक संधी देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे समितीने स्वागत केले. मात्र, आगामी भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांसाठी निगेटिव्ह मार्किंगची पद्धत लागू करण्यात आल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.

डी ग्रुपच्या पदांसाठी निगेटिव्ह मार्किंगची आवश्यकता काय? असा सवाल उपस्थित करून ही पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच उमेदवारांना १ किलोमीटर अंतर ४ मिनिटे १५ सेकंदांत पूर्ण करण्याची अट आणि त्यानंतर ३५ किलो वजन घेऊन १०० मीटर धावण्याची शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याने समितीने आक्षेप घेतला. वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी ही चाचणी कठीण आणि जोखमीची असून त्यामुळे उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे समितीने म्हटले आहे. या मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष झा तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील आमदार व खासदारांना लेखी आणि ई-मेलद्वारे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आगामी भरती प्रक्रियेपूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून न्याय द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करून रेल रोकोसारखे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा समितीने दिला. बैठकीला अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश राजमाने, अनिल कुंभार, सचिन कुंभार, स्वरूप मुकादम, करण भुजबळराव, दिगंबर भारती, बबन नारकर, नीलेश गुरव, अस्मिता कांबळे, योगेश बंड्ये आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news