

चिपळूण शहर : मान्सून हंगाम नजीक आल्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञाने सज्ज असलेले हवामान खाते जागे होते आणि मान्सून आगमनाच्या वेळापत्रकाचे दररोज वेगवेगळे अचूक अंदाज वर्तवले जातात. मात्र, शेतकरी ज्या नैसर्गिक व पूर्वांपार मान्सून संकेतावर अवलंबून असतो, त्यातील वेळापत्रकात कोणतेही बदल होत नाहीत. त्यातीलच एक निसर्गातील मान्सून आगमनाचे संकेत देणारा वृक्ष म्हणजे बहावा. या बहावा वृक्षाला इंग्रजीमध्ये ‘रेन ट्री’ म्हणून ओळखले जाते. अशा या बहावा वृक्षाला बहर आला आहे. त्यामुळेच त्याला ‘राजवृक्ष’ असे संबोधले जाते. त्याच्या बहरामुळे मान्सून उंबरठ्यावर आल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी बहरलेल्या बहावावर अतिशय सुंदर कविता केली आहे. ‘नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द वाहवा, सोनवर्खिले झुंबरले ऊनी, लेऊन दिमाखात उभा बहावा’ अशा कडव्यांनी मान्सून आगमनाचे संकेत देणाऱ्या वृक्षाची ‘शॉवर ऑफ फॉरेस्ट’ अशी ओळख आहे. साधारणपणे मान्सून येण्याआधी दीड-दोन महिन्यांपूर्वी हा देशी वृक्ष बहावा नाजूक पिवळ्या फुलांनी पूर्णपणे बहरतो. या वृक्षावरची नाजूक पिवळी फुले म्हणजे कवयित्री इंदिरा संत यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘पिवळे धम्मक इवलेइवले लोलक दवबिंदूमध्ये लुकलुकतात आणि हिरव्या पानाच्या कोंदणात पाचूचा साज चढावा तशी दिसू लागतात.’ अशा या बहावा वृक्षाला बहर आला आहे. निसर्ग आपले काम चोख आणि नियोजित वेळेतच करतो. त्याचेच हे उदाहरण ठरावे. बहावा हा शेतकऱ्यांबरोबरच वनांचाही मित्र मानला जातो. म्हणूनच त्याला ‘शॉवर ऑफ फॉरेस्ट’ व ‘नेचर इंडिकेटर’ म्हणून संबोधले जाते.
बहावा फुलला की मान्सूनचे आगमन लवकरच होणार याचे संकेत मिळताच शेतकरी देखील शेतीच्या कामात गुंतून जातात. एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या हवामान खात्याचा रोज बदलणारा अंदाज चुकेल; मात्र निसर्गचक्रातील बहावा असेल किंवा चातक, पावशा पक्षी असेल यांच्याकडून मान्सूनच्या आगमनाची वर्दी चुकणार नाही. पूर्वी अशाच निसर्गनिर्मित अंदाजांवर शेतकरी अवलंबून होता. आधुनिक काळातही त्यात कोणताही बदल झालेला नाही. केवळ भर पडली ती हवामान विभागाच्या अंदाजाची. मात्र, निसर्गावर त्याचे परिणाम झाले नसल्याचे दिसून येते. भौतिक सुख आणि विकासाच्या नावाखाली माणसांकडून आजच्या घडीला निसर्गावर आघात होत असताना देखील निसर्ग आपला स्वभाव बदलत नाही, हेच बहरलेल्या बहावा वृक्षाकडून स्पष्ट होते.
कवयित्री इंदिरा संत यांच्या शब्दांत, ‘ज्याज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुज दाह सहाया, त्यात्या वेळी अवतरेन मी बहावा रूप तुझे सुखवाया’ असे सांगावे लागेल. एकूणच आधुनिक काळात देखील बहावा वृक्ष आपले निसर्गचक्र संतुलन ठेवत स्वतःचे काम चोख करत आहे. त्यातूनच या आधुनिक विकासाकडे झेप घेणाऱ्या आणि निसर्गाचे संतुलन बिघडविणाऱ्या मनुष्यासाठी इंदिरा संत म्हणतात, ‘बहावा म्हणजे पितांबर नेसूनी युगंधर, जणू झळकला या भूलोकी, पुन्हा एकदा पार्थासाठी गिताई तो सांगे श्लोकी’ अशा या ओळींतून आधुनिकतेची कास धरणाऱ्यांना निसर्गाचे महत्त्व बहावा वृक्षाच्या माध्यमातून सांगितले आहे.