

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. घाटातील दक्खन बस थांब्याजवळ एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (क्रमांक एमएच १४ बीटी २७५३) घेऊन खडीकोळवण ते साखरपा अशी जात होते. दरम्यान, बस आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ आली असता, समोरून येणाऱ्या कारने (क्रमांक एमएच ११ डीझेड ०३२९) बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. कारचालक संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे आपल्या कारमधून रत्नागिरीहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांमधील एकूण ५ जण जखमी झाले आहेत. यात एसटी चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे, एसटी प्रवासी संजय तुकाराम शितप (५८, रा. खाडीकोळवण), कार चालक संतोष शिवाजी पवार कारमधील प्रवासी शंभूराज शिवाजी पवार (१३, रा. रामनगर, सातारा), श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (२७, रा. भिवंडी, ठाणे) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना गाड्यांमधून सुखरूप बाहेर काढले. सर्व जखमींना तत्काळ साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी साखरपा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.