रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. गावठी हातभट्टी दारूच्या भट्टया उद्ध्वस्त केल्या जात आहेत. त्याचबरोबर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत अवैध मद्य प्रकरणी ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिका-यांनी गावठी दारू आणि गोवा मद्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी भरारी पथकासह दोन्ही उपविभागांना कारवाया करण्याच्या सक्त सूचना केल्या. भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडाळकर यांनी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर गावठी दारूच्या हातभट्ट्या शोधून त्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सुमारे ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून १७६ लिटर गावठी दारू ६.६६ वल्क लिटर देशी आणि गोवा बनावटीचे १२.२४ बल्क लिटर मद्य असा ८८ हजार २५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर १ हजार ५०५ लिटर गावठी दारूच्या हातभट्टीचे रसासन नष्ट करण्यात आले.
एकीकडे गावठी दारूवर कारवाई सुरू असतानाच गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीकडेही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महामार्गावरील रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, दि. १ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत अवैध मद्याविरूद्ध ८० गुन्हे दाखल झाले असून, १५ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.