

खेड :खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ३० जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जगबुडी नदीची पाणीपातळी ४.४० मीटर इतकी नोंदवण्यात आली असून नदीची इशारा पातळी ५ मीटर आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या भागांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
खेड तालुक्यात गेल्या ४८ तासांत २२२.४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे जगबुडी आणि नारिंगी या प्रमुख नद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढू लागली असून नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी पोहोचल्याने भात लागवडीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. लावणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नातूवाडी मध्यम प्रकल्पात ३७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
हवामान विभागाने कोकणात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी तसेच सखल भागातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.