

खेड : शहर व परिसरात ग्रामीण भागात अवघ्या बारा तासांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. खेड अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत सर्व ठिकाणची आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.
पहिली घटना रविवारी (दि. १५ मार्च) सायंकाळी सुमारे ७.०५ वाजण्याच्या सुमारास चिचघर येथील प्रभूवाडीमध्ये घडली. येथे गुरांच्या गोठ्याला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच खेड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात यश आले. त्यानंतर रात्री सुमारे ८.०० वाजता खेड शहरातील तांबे मोहल्ला येथे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करून ही आग देखील नियंत्रणात आणली.
दरम्यान, त्याच रात्री सुमारे १०.०० वाजण्याच्या सुमारास मंडणगड मार्गावरील धामणी येथे गुरांच्या गोठ्याला आग लागल्याची तिसरी घटना घडली. या ठिकाणीही अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग विझवली.या तिन्ही घटनांमध्ये खेड अग्निशमन विभागाचे फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग आणि सुरेश शिगवण यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सर्व ठिकाणची आग पूर्णपणे विझवून पथक रात्री १.०० वाजता अग्निशमन केंद्रात परतले.
अवघ्या काही तासांत तीन ठिकाणी लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले असलेतरी मोठे नुकसान टळल्याची माहिती मिळाली आहे.