Ratnagiri News : खेड बसस्थानक परिसरात दुर्गंधी

प्रवासी व कर्मचाऱ्यांचे हाल; सांडपाणी साचत असल्याने समस्या
खेड : येथील बसस्थानक परिसरात अलोकेशन कार्यालयासमोर वाहणारे सांडपाणी.
खेड : येथील बसस्थानक परिसरात अलोकेशन कार्यालयासमोर वाहणारे सांडपाणी.
Published on
Updated on

खेड : येथील बसस्थानक परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रवासी तसेच राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चालक-वाहक यांची नियतने वाटप करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षांसमोर दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचत असल्याने परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे.

खेड बसस्थानकात सकाळपासून रात्रीपर्यंत शेकडो प्रवासी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांची ये-जा असते. मात्र साचलेल्या सांडपाण्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध नागरिक व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय संबंधित कार्यालयाच्या भिंतीवर ‌‘नो पार्किंग‌’चे फलक लावण्यात आले असतानाही काही वाहनधारकांकडून बेशिस्तपणे दुचाकी वाहने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून प्रवाशांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खेड बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मासळी बाजार भरत असल्याने अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे. मासळी विक्रीमुळे निर्माण होणारा कचरा व दुर्गंधी यामुळे परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी एसटी आगारांमधील अस्वच्छतेचा विषय गांभीर्याने घेत काही ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली होती. त्यामुळे खेड बसस्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबतही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news