भरणे नाक्यावर भीषण अपघात : भरधाव कारची आराम बसला धडक; ५ जण गंभीर जखमी

ratanagiri accident | पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले
भरणे नाक्यावर भीषण अपघात : भरधाव कारची आराम बसला धडक; ५ जण गंभीर जखमी
Published on
Updated on

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाकानजीक शुक्रवारी (दि. ९ मे) सकाळी भीषण अपघात घडला. प्रवासी उतरविण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आराम बसला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय ४८), शिल्पा परशुराम खेराडे (५०), जनार्दन खेराडे (४०), परशुराम गुणाजी खेराडे (६०, सर्व रा. संगमेश्वर) तसेच अर्जुन धोंडीबा चाळके (३०, रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. खेड पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, जखमींपैकी परशुराम खेराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news