

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कशेडी बोगद्याजवळ 24 ऑगस्ट रोजी पहाटे 2.10 वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली ही बस गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गात मालवणला जात असताना हा अपघात झाला.
मालवणच्या दिशेने निघालेली खासगी आराम बस (एम. एच. 02 एफ. जी. 2121) पोलादपूर येथे कशेडी भुयारी मार्गाजवळ आली असता, तिला अचानक आग लागली. बसचे मालक ओमकार मागले हे असून, वाहन चालक सचिन लोके यांनी बसला आग लागल्याचे लक्षात येताच तत्परता दाखवत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.