

खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या भोजन व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य ठेकेदाराकडून पैसे मिळत नसल्याने सब ठेकेदाराने भोजन पुरवठा बंद केल्याची माहिती समोर आली असून, शनिवारी सायंकाळी ३० रुग्णांना जेवणाविना राहावे लागलेे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या भोजन व्यवस्थेतच व्यत्यय आल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय झाली.
रुग्णालयातील भोजन पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सब ठेकेदाराला मुख्य ठेकेदाराकडून देय रक्कम मिळालेली नसल्याने हा प्रकार घडल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराची शासनाकडे चार महिन्यांहून अधिक काळाची बिले थकीत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे भोजन पुरवठा सुरू ठेवणे कठीण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भोजन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला गॅस सिलिंडर संपल्याचे कारणही पुढे आले आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भोजनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील भोजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार आणि रुग्णांना नियमित भोजन मिळण्याची कायमस्वरूपी व्यवस्था कशी करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
मुख्य ठेकेदाराकडून सब ठेकेदाराला वेळेवर पैसे मिळत नसतील तर त्याचा परिणाम रुग्णांच्या भोजन व्यवस्थेवर होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. भविष्यात अशाप्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पर्यायी भोजन व्यवस्था, गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा आणि ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.