

रत्नागिरी :जिंदलमध्ये वायुगळती झाली, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे जिंदल कंपनीने ग्रामस्थांना गृहीत धरू नये आणि स्वत:च्या मस्तीत राहू नये, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिंदल समूहाच्या पोर्टच्या व्यवस्थापनाला दिला आहे. वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75 हजार रुपये भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केले असून ते लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतील, असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या घटनेची चौकशी अद्याप सुरू असून, गॅस विषयामध्ये तज्ज्ञ असणार्या प्राध्यापकांनी या ठिकाणीची पाहणी केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर अंतिम अहवाल तयार होईल. वायू दुर्घटना नेमकी कशी व कुठे झाली, याची माहिती पुढे येईल. मुलांना झालेला त्रास हा वायुगळतीमुळेच झालेला असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. संपूर्ण अहवाल तयार झाल्यावर तो सर्वांच्या समोर आणला जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
जिंदलकडून बाधित विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये दिले जाणार असून ते प्रशासनाकडे कंपनीने जमा केले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. या भागात शिकणार्या सर्व विद्यार्थ्याचा मेडीक्लेमही केला जाणार आहे. जयगड पंचक्रोशीसाठी कंपनी अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे. जिंदलने कंपनी सुरु करण्यापूर्वी 100 खाटांचे रुग्णालय उभे करण्याचे लेखी दिले होते. त्यानुसार रुग्णालयाचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. सध्याचे डॉक्टरही बदलण्यात आले असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. बाधित विद्यार्थ्यांना सुरभी हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी जिंदलने दक्षता घ्यायला हवी असेही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रशासकीय इमारतींच्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद नवीन इमारत, प्राणी संग्रहालय, स्टेडियम, मल्टीमेडीया थ्रिडी शो, कोकण बोर्ड, चिपळूण प्रांत कार्यालय, जिल्हा क्रीडासंकुल या इमारतींचा आढावा घेऊन कामे कधी पूर्ण होणार, याची माहिती घेतली.
मराठी भाषा विभागात जिल्ह्यासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या काम पाहणार आहेत. 14 ते 28 जानेवारी दरम्यान मराठी संवर्धन दिन साजरा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी कवी केशवसूत स्मारक, प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम व मोठ्या शिक्षण संस्थेसोबत एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने सर्व व्यापारी वर्गानेही मराठीमधून दुकाने व व्यवस्थापनाने फलक लावेत. मराठी बोर्डबाबत जीआर निघालेला असल्याने त्याची अंमलबजावणी व्हावी असे त्यांनी सांगितले.
सध्या जिंदल पोर्टला दोन एलपीजी टँकर शीप आली आहेत. देशात गॅस टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी ही दोन शीप उतरवून त्याची वाहतूक केली जाणार आहे. त्यानंतर अहवाल आल्यावर आणि कंपनीने आश्वासनांची पूर्तता केल्यावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरीत शिरगाव येथे जन्मदाखला दिल्याप्रकरणात वीस संशयित दाखले तपासण्यात आले आहेत. बांगला देशी लोकांना हाकलून देण्यात यावे. कुणीही बांगलादेशींना पाठीशी घालू नये, असा सज्जड दम उद्योगमंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी दिला आहे. पोलिस यंत्रणेसह जिल्हा परिषदेच्या सीईओंनाही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.