Ratnagiri News : जलजीवन मिशन; पावणेचार लाख कुटुंबांच्या घरात पाणी

जिल्ह्यात 568 गावांत प्रत्येक घरात नळजोडणी पूर्ण; गावे हर घर जल घोषित, आतापर्यंत 608.46 कोटी खर्च
Jal Jeevan Mission
जलजीवन मिशनpudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 568 गावांमध्ये नळजोडणीचे कामे पूर्ण झाली आहेत. ही गावे हर घर जल घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 4 लाख 48 हजार 161 कुटुंबांपैकी 3 लाख 88 हजार 165 म्हणजेच तब्बल पावणेचार लाख कुटुंबांना घरगुती स्तरावर नळजोडणी देण्यात आली आहे. त्या कुटुंबांच्या नळाला पाणी आले आहे.

दरम्यान, ही योजना पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत होती. मात्र निधी नसल्यामुळे कामे वेळेत पूर्ण होवू शकली नाहीत. त्यामुळे केंद्र शासनाने जलजीवनच्या कामांसाठी मार्च 2028 अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यासह राज्यातील गावे, वाडी रस्त्यांवरील नागरिकांना नळांद्वारे घरात शुध्द पाणी मिळावे, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राज्यात जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाना नळजोडणी देवून कायमचा पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाड्या, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

जिल्ह्यातील 1 हजार 428 कामे पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आले. आतापर्यंत 595 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत तर प्रत्यक्षात 384 योजनांतील पूर्ण कामे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत 608.46 कोटी रूपये इतका खर्च झाला आहे. दरम्यान, त्यापैकी 568 योजना हर घर जल म्हणून घोषित करण्यात आली असून सर्वांच्या नळाला पाणी आले आहे. उर्वरित 966 गावे हरघर जलघोषित करणे बाकी आहे.

15 टँकरनी पाणीपुरवठा सुरू

जिल्ह्यात दरवर्षी पाणी पुरवठा योजनावर कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. तरीही जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. कित्येक कामे पूर्ण होवून ही जिल्ह्यात 15 टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news