Amir Gas Ship Seized : जयगड बंदरातील ‘आमीर गॅस’ जहाज जप्त

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; जहाजावरील माल उतरवण्यास मनाई
Bombay High Court
Bombay High Court pudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : जयगड बंदरात चौकशीसाठी आणलेल्या ‘आमीर गॅस’ जहाजाला जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश देत पुढील निर्देश येईपर्यंत जहाजावरील माल उतरविण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच हे जहाज जेसएडब्ल्यू जयगड पोर्ट लि. च्या हद्दीबाहेर जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणात बोगस कागदपत्रांच्या आधारे माल वळवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. झॅग युनियन इंटरनॅशनल या कंपनीने तक्रार दाखल केली असून, बचाव पक्षात एलपीजी ‘आमीर गॅस’ जहाजाचा समावेश आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील ‘एलपीजी (मिक्स) इन बल्क’ माल उतरवण्यास न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. तसेच जहाज जयगड बंदरातच थांबवून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने जेसएडब्ल्यू जयगड पोर्ट ली.ला जहाजाला ‘आऊटवर्ड पोर्ट क्लिअरन्स’ देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच जहाज भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये आणि त्यावरील माल उतरवला जाणार नाही, याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी, असेही आदेशात नमूद आहे. आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या जहाजाबाबत तपासात अधिक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. जहाजाचे दोन वेगवेगळे मालक असून त्यांच्या अधिकारांमध्ये मतभेद होते. गॅस वाहतुकीसाठी जहाज भाडेकरारावर घेतले गेले होते. संबंधित कार्गो इराकमध्ये भरला गेला होता आणि तो पाकिस्तानला नेण्याचे नियोजन होते.

तपासात असेही समोर आले की, जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने मास्टर बदलून दुबई येथे चुकीची माहिती देत जयगड बंदरात येण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत न्यायालयाने जहाज जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात स्थानिक शिपिंग एजंट मिलिंद बनप यांनी न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news